कोल्हापूर हादरले! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, तोंडात बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक
Kolhapur Crime News : कोल्हापुरातील आळतेमध्ये असेलेल्या मदरशामध्ये 90 विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत असून त्यापैकी 70 मुले ही बिहारमधील आहेत. अशा मदरशांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणवीर आला आहे.

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील आळते इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबतच राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केली. हत्या करण्यापाठीमागचे कारण हे अतिशय धक्कादायक आहे. मदरसा बंद पडावा आणि सुट्टी मिळावी, गावी जाता यावं म्हणून आरोपी मुलाने त्याच्या सहकारी मुलाची अशा पद्धतीने हत्या केली आहे. हत्या झालेला अल्पवयीन मुलगा हा बिहारचा आहे तर हत्या करणाराही बिहारचाच असल्याचं समोर आलं आहे.
Kolhapur Madrasa News : फैजनची इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आळते गावच्या माळरानावर धार्मिक शिक्षण देणारे मदरशा आहे. या मदरशामध्ये जवळपास 90 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र त्यापैकी 70 विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. तर इतर मुलं राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आली आहेत. याच धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये फैजन नाजीम नावाचा अकरा वर्षाचा विद्यार्थी देखील शिक्षण घेत होता. मात्र त्याच्यासोबतच राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक शॉक देऊन फैजानची हत्या केली.
ज्या विद्यार्थ्याने हा प्रकार केला त्याने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फैजानच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा घातला. त्याच्यानंतर त्याच्या पायाला आणि हाताला इलेक्ट्रिक वायर बांधली. स्विच ऑन करून आरोपी मुलगा देखील झोपी गेला. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास नमाजसाठी मुलांना उठवण्यात आलं. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.
Kolhapur Crime News : मदरसा बंद पडावा म्हणून कृत्य
या धार्मिक शिक्षण संस्थेतील प्रत्येक रूममध्ये 25 विद्यार्थी राहतात. 15 जून रोजी रात्री अकरा वाजता फैजानची हत्या केली. 16 जूनच्या पहाटे फैजान मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत संशय आल्याने संबंधितांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पण चौकशीत एक धक्कादायक बाब उघड झाली. हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलानं मदरसा बंद पडावा, सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी हे सगळं केल्याचं समोर आलं.
अल्पवयीन मुलानं गुन्हा कबुल केला आहे. पण या प्रकरणावर अजून काही मुलांची चौकशी सुरु आहे. ही हत्या कट रचून करण्यात आली आहे का? शॉक देण्यासाठी मुलानं वायर कुठून आणली? याचा शोध पोलिस घेत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिले जातं. मात्र अशा पद्धतीची कोणतीही घटना घडली नव्हती अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
Kolhapur Murder : मदरशांवर धार्मिक वचक कुणाचा?
आळते या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे अशा पद्धतीने शिक्षण देणाऱ्या धार्मिक शिक्षण संस्थांवर नेमका कुणाचा वचक असणार? इथे येणारी मुलं परराज्यातून इतक्या मोठ्या संख्येने कशी काय येतात? त्यांच्या सुरक्षेचे काय होणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली ही घटना धक्कादायक आहे. राज्यात धार्मिक शिक्षण देणाऱ्या अशा अनेक संस्था आहेत जिथे अल्पवयीन मुलं शिक्षण घेतात. मात्र अशा शिक्षण संस्थांचा कारभार व्यवस्थित चालतो का? तिथे बाल हक्क कायद्याचं उल्लंघन होतंय का? मुलांची पिळवणूक तर होत नाही ना? याची चौकशी होणं गरजेचं आहे.
ही बातमी वाचा:

