Amol Mitkari : औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे; अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर
Amol Mitkari On Aurangzeb Kabar : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरून अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिलाय.

Amol Mitkari On Aurangzeb Kabar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी म्हणाले की, औरंगजेबच्या कबरीचं राजकारण करणार्यांनी आधी सोलापूरकर व कोरटकर यांची कबर कधी खोदणार त्याचं उत्तर द्यावं, मी सत्तेतला आमदार आहे. कोटकरचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं की, त्यांना मिळालेल्या जामीनाविरोधात कोर्टात युक्तीवाद करणार, पण सोलापूरकरचं काय? त्याला अजून का अटक नाही हा संशोधणाचा विषय आहे. जो पर्यंत तो विषय मार्गी लागत तोपर्यंत तो लावून धरणार, तर चुकीचा इतिहास सांगणारे नितेश राणे व अतुल भाटकर यांना त्यांना समजतील अशी पुस्तक भेट देतो. ते मला ब्रिगेडिअर विचाराचा समजतात, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. सुप्रिया सुळे यांची या बैठकीतील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात ते पक्षात असतानाही माझी लढाई सुरु होती. मला कधी कधी वाटतं, बरं झालं पक्ष फुटला. कारण या सगळ्या प्रकारानंतर एकतर ते तरी पक्षात राहिले असते किंवा मी तरी पक्षात राहिले असते. जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करु शकत नाही. ते पक्षात असतानाही माझी त्यांच्याविरोधात लढाई सुरु होती, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले की, सुप्रिया ताई त्यांच्या पक्षाच्या बैठकीत बोलल्या आहेत. त्यांच्या पक्ष वाढीसाठी बीडच्या घटनेनंतर त्या बोलल्या असल्याने ठीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

