Designed & developed byDnyandeep Infotech

२४. महाप्रस्थान -१

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

२४. महाप्रस्थान -१
१९५० च्या मे महिन्यात राष्ट्रसेवादलाचे वासंतिक शिबिर सांगली येथे भरले होते. गुरुजींना सेवादल म्हणजे प्राणवायू! ते सांगलीला गेले. सेवादल सैनिकांपुढे बोलताना त्यांनी आंतरभारतीप्रमाणेच 'सेवापथका'ची अभिनव कल्पना मांडली.
ते म्हणाले, 'जातिधर्म निरपेक्ष अशी महान राष्ट्रीय भावना, तिचा प्रचार, अधिंक धान्याची उत्पत्ती, स्वच्छता, साक्षरता-प्रसार, सहकारी शिक्षण अशा निरनिराळ्या आजच्या गरजा आहेत. सेवादलाने हे व्यापक शिक्षण, या गरजा भागवणारे शिक्षण स्वत: घेऊन राष्ट्राला द्यायला उभे राहिले पाहिजे. कणभरही निर्मळ सेवा तारणारी आहे. मणभर सेवा की कणभर सेवा, हा महत्त्वाचा प्रश्‍न नाही. ही दृष्टी, तो ध्यास आहे की नाही, हा प्रश्‍न आहे. जोवर सेवादलाजवळ सेवेचा प्राण आहे, तोवर सेवादल अमर आहे. लिहा-वाचायला शिका आणि भूमातेच्या सेवेला जा. घरे बांधा, बांध घाला, नद्यानाले अडवा, खते फुकट नका दवडू, रस्ते करा, गायरानें ठेवून बाकीची सारी जमीन लागवडीस आणा... क्षुद्र भेदांच्या पलीकडे जाऊन अंतरात्म्याला पाहाणारी ज्यांची दृष्टी असे शेकडो सेवादल सैनिक, हे नवव्रती तरुण जर भारताला मिळतील तर आलेले स्वराज्य पुरुषार्थप्रद आज ना उद्या करता येईल.”

मेच्या अखेरीस गुरुजी कर्नाटकात धारवाड, हुबळी, गदग इत्यादी ठिकाणी गेले होते. तिथे त्यांची गीतेवर प्रवचने झाली. आंतरभारतीच्या दृष्टीने शेजारच्या प्रांताची ओळख झाली. कन्नड वाङ्मयासंबंधी बरीच माहिती मिळाली. लोकजीवनाचे
जवळून दर्शन घडले. कर्नाटकचा दौरा संपवून २ जून रोजी गुरुजी मुंबईला परतले आणि पुढच्याच आठवड्यात मनीध्यानी नसताना गुरुजींनी आपली जीवनज्योत मालवून या जगाचा निरोप घेतल्याची अत्यंत कटू वार्ता साऱ्या महाराष्ट्राला, भारताला ऐकायला मिळाली.

११ जून १९५० चा तो दिवस होता. अवघ्या महाराष्ट्राला गुरुजींच्या निधन वार्तेने धक्का बसला.

'साधने'च्या त्या दिवशीच्या खास अंकात रावसाहेब पटवर्धन यांनी हे दु:खद वृत्त देताना लिहिले होते :
'पू. साने गुरुजी आज पहाटे चार वाजता इहलोक सोडून देवाघरी गेले! त्यांच्या आकस्मिक देहान्तवासाचे वृत्त ऐकून अवघ्या महाराष्ट्राला धवका बसेल. हजारो तरुणांचे साने गुरुजी हे एक आराध्यदैवत होते. शेकडो तरुणांना गुरुजी मातेसमान
वाटत. महाराष्ट्राच्या नैतिक व सांस्कृतिक मूल्यांची गुरुजी व त्यांची 'साधना' म्हणजे अखंड वाहणारी भागीरथी होती.
गुरुजींना नैसर्गिक मृत्यू आलेला नव्हता. त्यांनी तो झोपेच्या गोळ्या घेऊन जवळ केलेला होता. गुरुजींनी हे असे कां केले होते?... आजही अनेकांच्या मनी हे कुतूहल आहे.'

गुरुजींच्या प्रकृतीतच, अगदी प्रथमपासूनच त्यांना मृत्यूची विलक्षण ओढ असल्याचे दिसते. सेवेचे प्रचंड काम करूनही आपल्या हातून काहीच सेवा होत नाही, असे त्यांना वाटत असे. त्यांनी स्वत:संबंधी एके ठिकाणी लिहिले आहे, “माझे स्थान मला कोठेच दिसत नाही. मला वर्णच नाही. नवीन सर्वोदयकारी विचार देणारा मी ब्राह्मण नाही, अन्यायाविरुद्ध तडफेने उठून, बंडाचा झेंडा उभारून मारण-मरण करणारा मी क्षत्रिय नाही. देशातील उद्योगधंदे कसे वाढतील; कृषी-गोरक्षण
कसे सुधारेल; ग्रामोद्योग कसे जगतील; मधुसंवर्धन विद्या, कागदाचा धंदा वर्गैरे कसे पुनरुज्जीवित होतील यासंबंधी मला काही येत नाही, मौ केवळ मजुरी करणारा शूद्रही नाही. कारण मजुरीची संवय नसल्याने तासन्‌तास शरीरश्रम मी करू शकत नाही. मग माझा उपयोग काय? रात्रंदिवस हा विचार मला टोचीत असतो. मला खाणे विषमय वाटते, जगणे असह्य होते. ज्याला प्रामाणिकपणे वाटते की आपण भारभूत आहोत त्याने खुशाल जीवन संपवावे...”

स्वत:विषयी अत्यंत लघुत्वाची, नव्हे तर नगण्यतेची भावना त्यांच्या मनी वसत होती. यात त्यांच्या ठायीची प्रांजळ नम्रता, सौजन्य, लीनता, ऋजुता हे सर्व श्रेष्ठ गुण होते. 'आपला जगाला काही उपयोग नाही' ह्या उपयुक्ततेच्या दृष्टीने त्यांनी
असे स्वत:चे मूल्यमापन केले होते, तसेच त्यांच्या ठायी मृत्यूचे आकर्षणही जबरदस्त दिसते. 'मृत्यूचे महाकाव्य” नावाचे एक प्रकरणच त्यांनी आपल्या 'भारतीय संस्कृती' नामक ग्रंथात लिहिलेले आहे. गुरुजी लिहितात, “मृत्यू म्हणजे
जीवनातल्या वृक्षाला लागलेले गोड फळ. गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. काम करता करता हे वस्त्र जीर्ण झाले, फाटले की त्रिभुवन माउली नवीन वस्त्रे देण्यासाठी आपणास बोलाविते. पुन्हा नवीन आंगडे-टोपडे लेववून या
जगाच्या अंगणात ती खेळावयास पाठविते आणि दुरून गंमत बघते...

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click