Designed & developed byDnyandeep Infotech

२. जडणघडण -१

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

२. जडणघडण -१

साने यांचे घराणे मूळचे देवरूखचे. पण पुढे कालांतराने त्यातील काही शाखा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी स्थायिक झाल्या. या पालगड गावीच श्री. सदाशिवराव ऊर्फ भाऊराव आणि सौ. यशोदाबाई ऊर्फ बयो या दांपत्याच्या पोटी २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. बारशाच्या दिवशी नाव ठेवले होते पंढरीनाथ. पुढे शाळेत नाव घालण्याच्या वेळी तो झाला पांडुरंग. पांडुरंग सदाशिव साने व नंतर पुढे महाराष्ट्राचे साने गुरुजी म्हणूनच तो प्रसिद्ध झाला!

परंतु घरात आणि गावात मात्र त्याला 'पंढरी' म्हणूनच हाक मारीत असत. परंतु पंढरीला मात्र 'शाम' हे नाव फार प्रिय होते. थोडा मोठा झाल्यावर त्याने एकदा आपल्या आईला विचारलेसुद्धा होते की, “आई! माझं नाव राम का ग नाही ठेवलंस?” परंतु पुढे दापोलीच्या शाळेत शिकायला गेल्यानंतर त्याला तिथे राम नावाचा मित्रच मिळाला. या रामची आणि त्याची मैत्री जुळली, ती अखेरपर्यंत कायम होती. दोघांच्या जिवाभावाची मैत्री जुळली आणि पंढरीला राम भेटल्यामुळे तो मग आपल्या वाङ्मयसृष्टीत स्वत: श्याम बनला. पाठीवरची यशवंत, पुरुषोत्तम, सदानंद आणि थोरली आक्का ही भावंडे त्यांना अण्णा म्हणायची. श्यामच्या जीवनाला आकार देण्यात त्याच्या आईचा हातभार मोठा होता. श्याम कसा घडला, कसा वाढला त्याची स्मृती व हकिगत श्यामनेच शब्दबद्ध केली आहे. “श्यामची आई” पुस्तकाच्या प्रारंभी श्यामने आपल्याला बालपणी आईकडून मिळालेले उदंड प्रेम आणि शुभ संस्कार जीवनभर कसे पुरले; तीच त्याची जीवनसत्वे कशी बनली; रक्षणकर्ती कवचकुंडले कशी ठरली याच्या कथा-गोष्टी आठवणींच्या रूपाने सांगितलेल्या आहेत. श्यामने माणसाच्या मोठेपणाचा ऊहापोह करताना म्हटले आहे, “पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहानाचा मोठा करीत असतात. आई देह देते व मनही देते. जन्माला घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच.” श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली. “माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू! तिने मला काय काय दिले! तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला तिने मला शिकवले.

मनुष्यावर. नव्हे तर गाईगुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच मंला शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्‍यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकवले. कोड्यांचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही सत्त्व व स्वत्व न गमविता कसे रहावे, हे तिनेच मला शिकवले. आईने शिकवले त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो,

मृदतरंगी करून निवास
फुलास देई मग सुवास

तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई! आई!! आई!!!”

लहान लहान गोष्टींतून आणि छोट्या छोट्या प्रसंगातून याच माऊलीने आपल्या पंढरीला सर्वांभूती देव पाहण्याची, सर्वांवर प्रेम करण्याची मंगल शिकवणूक दिली.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click