Designed & developed byDnyandeep Infotech

२. जडणघडण -३

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

२. जडणघडण -३

“पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा”, अशी कोकणात म्हणच आहे. तिकडे पूर्वी घरोघरी पत्रावळीवरच जेवत्त असत. झाडपानांची समृद्धी कोकणात आहिच. त्यामुळे पत्रावळ, द्रोण लावण्याचे काम घरोघरी सर्वजण करत असत. श्यामच्या वडिलांना -- भाऊरावांना - पत्रावळीवरच जेवणे फार आवडे. ते पत्रावळ-द्रोणही फार सुरेख लावीत असत. शेतावरून येताना ते रोज देवासाठी फुले आणीत.

भाऊरावांना फुलांची फार फार आवड होती. पूजेला मुबलक फुले त्यांना हवी असायची. ते गणपतीचे भक्त होते. दरोज २१ दूर्वांची जुडी ते गणपतीला वहायचे. खुरटलेल्या दूर्वा त्यांना चालायच्या नाहीत. हिरव्यागार हव्यात. त्यासाठी ते लांबवर
जायचे. म्हणायचे, “देवाला साधी दुर्वा वहायची ती चांगली नको का?”

फुलांबरोबर ते भाजी आणि पत्रावळीसाठी पाने आणायचे. कधी वडाची, कधी कुडाची, कधी पळसाची, कधी धामणीची. नाना तऱ्हेच्या पानांच्या ते पत्रावळी करायचे. श्यामची आजी प्रत्येकाला पाने वाटून द्यायची. आणि ५-५ पत्रावळी लावायला सांगायची, सगळेजण पत्रावळ लावायचे. श्याम मात्र लावायचा नाही. आई एकदा म्हणाली, “श्याम, तू पत्रावळ लावायला शीक. नाहीतर जेवायला मिळणार नाही.”

“मला नाही येत. मी नाही लावणार!'' श्याम रागाने गुरकावला. त्यावेळी श्यामची आक्का माहेरपणाला आली होती. ती म्हणाली, “ये श्याम, मी तुला पत्रावळ लावायला शिकवते.” पण हट्टी श्यामने तिचेही ऐकले नाहो. पत्रावळ लावली नाही. आईने श्यामला धडा शिकवायचे ठरवले होते. ती म्हणाली, “ज्याने त्याने आपली पत्रावळ घेऊन बसावे.'” श्यामने पत्रावळ लावलीच नव्हती तर तो कुठून आणणार? तो फुरगदून ओसरीवर जाऊन बसला. पोटात भूक तर फार लागली होती. पुन्हा श्यामची आक्का त्याच्याजवळ आली. तिने त्यांची समजूत काढली. म्हणाली, “मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे तुला समजवायला? चल उठ, लहानसे ठिकोळ लाव.”

शयाम आक्काच्या प्रेमळ शब्दाने विरघळला. आक्काच्या सांगण्याप्रमाणे त्याने एक ठिकोळ बनवले. हातपाय धुवून आला. आईने त्याला ठिकोळावर जेवायला वाढले. म्हणाली, “पोटभर जेव. उगीच हट्ट करतोस!”

श्यामचा राग पूर्ण गेला नव्हता. तो भरभर जेवत होता. ठिकोळाचा एक टाका घासाबाहेर घशात अडकला. कसाबसा निघाला. श्याम म्हणाला, “येत नाही तरी म्हणे तूच लाव. घशात टाका अडकला की!”

“निष्काळजीपणा केला की असेच व्हायचे. नीट चांगली पत्रावळ लावायला शीक तोवर तुझी पत्रावळ तुला जेवायला दिली जाईल.”

श्याम तेव्हापासून पत्रावळ मन लावून लावू लागला. लवकरच त्याला छान पत्रावळ जमू लागली. एके दिवशी भाऊरावांना त्याने लावलेली पत्रावळ मुद्दामच मांडली. ती सुबक पत्रावळ पाहून त्यांनी विचारले, “चंद्रे, तू लावलीस का ग ही
पत्रावळ?”

“नाही भाऊ, ही श्यामने लावली आहे.

"अरे वा! इतकी चांगली यायला लागली का?" भाऊंनी श्यामला शाबासकी दिली. द्रोण कसा लावायचा हेही शिकवले.

श्यामच्या आजीने श्यामच्या हुशारीबद्दल श्यामला एक जर्दाळू खायला दिला. श्यामला तो फारच गोड लागला. तो म्हणाला, “समुद्रमंथनानंतर देवाला अमृतही तितके गोड लागले नसेल.” गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे.
कर्मातच आनंद आहे!

श्याम आई-वडिलांच्या पंखाखाली वाढत होता. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून श्यामला शिकायला मिळत होते. त्यांनी श्यामला जन्म दिला आणि त्यांनीच त्याचे जीवनकमळ फुलवले. त्यात प्रेमाचा रंग भरला. सेवेचा सुगंध दिला.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click