Designed & developed byDnyandeep Infotech

८. स्व-तंत्र शिक्षक -१

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

८. स्व-तंत्र शिक्षक -१

साने गुरुजींची शिक्षणदृष्टी निसर्गप्रधानच होती. साने गुरुजी हे निसर्गशिक्षकच होते. शाळेच्या चार भिंतीत मावणाऱ्या ७-८ विषयांच्या शिक्षणालाच केवळ ते शिक्षण मानत नसत, तर मनुष्यमात्राचं शिक्षण जन्मापूर्वीपासूनच सुरू झालेलं असतं
आणि ते अखंड अखेरपर्यंत चालू असतं असंच त्यांचं म्हणणं होतं.

गुरुजी स्वत: विद्यासंपन्न, बुद्धिमान होतेच; पण त्याशिवाय त्यांना आईचं मन, मातृहृदय लाभलं होतं. ते मातृधर्मी शिक्षक होते, त्यामुळं शिक्षणावर त्यांचं जसं प्रेम होतं, तसंच मुलांवरदेखील उदंड प्रेम होतं.

तसं पाहिलं तर साने गुरुजींनी तथाकथित शिक्षणशास्त्र अभ्यासलं नव्हतं. शिक्षणशास्त्राची तथाकथित परीक्षाही त्यांनी कधी दिलेली नव्हती. म्हणून शिक्षणशास्त्राची तथाकथित पदवीही त्यांना चिकटलेली नव्हती. परंतु तरीही तथाकथित शिक्षण पंडितांपेक्षा ते सरस आणि सुरस शिकवीत असत. अंमळनेरच्या शाळेत ते जेव्हा 'सर' होते, तेव्हा त्यांचा तास कसा रंगून जात असे त्याच्या अनेक आठवणी त्या काळातील त्यांचे विद्यार्थी आणि सहाध्यायी सांगत असतात.

साने गुरुजी हे तसे शिक्षणशास्त्रात शिकलेले पढिक, परतंत्र शिक्षक नव्हते. ते 'स्व-तंत्र शिक्षक होते. त्यांनी आपलं स्वत:चंच असं शिक्षणतंत्र शोधलं होतं, निर्माण केलेलं होतं. त्यांचं प्रत्येक कर्म हा त्यांच्या आत्म्याचा उद्गार असे! म्हणून त्यांना कर्मकांडी तंत्र कधीच मानवलं नाही. या स्वतंत्र, व्यापक वृत्तीमधूनच ते शिक्षणाकडे बघत असत. त्यांची शिक्षणदृष्टी आणि शिक्षणविचार सांकेतिक, पोथोबंद, परंपरागत जड स्वरूपाचे नव्हते आणि आपले विद्यार्थी हे चैतन्याचे पुंज होत आणि विविध प्रकारच्या जीवनदर्शनातून त्यांचे मन:पुंज फुलवायचे आहेत असा त्यांना ध्यास होता. त्यासाठीच त्यांचा श्वास होता.

पालगडला लहानपणी मराठी दुसरी-तिसरीत शिकत असताना त्यांना धोंडोपंत कुलकर्णी नावाचे एक शिक्षक होते. सकाळी शाळेत गेले की ते साऱ्या मुलांना ओळीत उभे करायचे. हातात छडी घ्यायचे आणि एकेकाला विचारायचे, 'दात घासले का? शौचास जाऊन आलास का? आंघोळ केलीस का? सूर्यनमस्कार घातलेस का?”

साने गुरुजींनी पुढे त्यांचा उल्लेख 'छडीनं आरोग्य शिकवणारे शिक्षक' असा केला आहे. शिक्षणात छडीचा, धाकाचा, रागाचा, संतापाचा, आदळआपटीचा प्रकार गुरुजींना मान्य नव्हता. इतकंच नव्हे, तर शिक्षक वर्गात मुलांना हेटाळणीनं बोलतात, हेटाळणीनं वागतात याचंही त्यांना दु:ख होत असे.

दापोलीच्या शाळेत असताना त्यांचे एक वर्गशिक्षक त्यांना बावळ्या साने म्हणूनच हाक मारायचे. याविषयी गुरुजींनी पुढे लिहिले आहे, “हे शिक्षक मला नेहमी बावळ्या म्हणून संबोधित असत. हे शब्द ऐकून माझ्या हृदयाचं पाणी पाणी
होई. खरोखरच का आपण बावळट आहोत? असं मनात येई. माझा बावळटपणा दूर करणं हे त्या शिक्षकाचं काम होतं. परंतु तो मार्ग मला न दाखवता नेहमी त्याच त्या विशेषणानं मला हाक मारीत गेल्यानं माझा बावळेपणा वाढला मात्र असेल! अशा रीतीनं आपण मुलांची मनं किती दुखवितो, याची शाळेतील शिक्षकांना खरोखर कल्पना नसते. त्यांचा खेळ होतो, परंतु मुलांचा जीव जातो!”

वर्गातील माझ्यासभोरची मुलं ही प्रभूच्या मूर्ती आहेत, अशी भावना शिक्षकाची हवी.

शिक्षणाकडे पाहण्याचा गुरुजींचा दृष्टिकोण परमपवित्र, उदात्त, मंगल होता. यालाच वेगळं शब्दरूप देताना त्यांनी म्हटले :

करी मनोरंजन जो मुलांचे ।
जडेल नाते अभूशी तयाचे ।

या पद्यपंक्तीत गुरुजींचा शैक्षणिक दृष्टिकोण आणि मुलांविषयीची श्रद्धामय थोर भावना दोन्ही व्यक्त झालेली आहेत!

त्या प्रभूंना क्षुद्र मानू नका. उद्याच्या जगाचे नियंते तेच आहेत, असं भगवान येशूप्रमाणे त्यांनाही मनोमन वाटत होतं. गुरुजी एके ठिकाणी म्हणतात, “मला महत्त्व आहे, मला क्षुद्र लेखू नका, असं बालब्रह्म बाहू उभारून, पुकारून सदैव
सांगत असतं. परंतु त्या बालब्रह्माला घरी-दारी सर्वत्र धिक्कारण्यात येतं, पायाखाली तुडवण्यात येतं आणि अशा या कृतीला शिक्षण हे पवित्र नाम देण्यात येतं.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click