Designed & developed byDnyandeep Infotech

१. मातृधर्मी साने गुरुजी

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१. मातृधर्मी साने गुरुजी

मराठी मुलखात मातृधर्मांचे शिवार प्राचीन काळापासून बहरलेले आहे. खरं तर भारतीय संस्कृतीनेदेखील 'मातृदेवो भव' अशी प्रथम वंदना मातेलाच दिलेली आहे.

'न मातु: परदैवतम्' अशी संस्कृत सुभाषितकारांची वाणी इथे सतत निनादत आलेली आहे. इतकेच नव्हे तर मराठी माणसाने पुरुषाच्या ठिकाणीसुद्धा मातृत्व पाहण्याची आगळीवेगळी दृष्टी इथे अनुभवलेली आहे, फुलवलेली आहे पंढरीचा पांडूरंग हे तर महाराष्ट्राचे आराध्य देवत! अठ्ठावीस युगे कटिवरी हात ठेवून भक्ताला पालवीत विटेवर उभा असलेला श्रीविठ्ठल हा आमचा खरं तर पिता--बाप. परंतु आमच्या सर्व संतांना या पिताश्रीपासून जो प्रीतपान्हा लाभला आणि जे प्रेमवात्सल्य मिळाले त्यामुळे सुखावून विठोबाची "विठाई" केली. आणि हे आगळेवेगळेपण इथल्या संतांनाही लाभले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हा त्याच चालीने 'ज्ञानेश्वर माउली' झाला. आणि याच परंपरेत आधुनिक महाराष्ट्रात बाळगोपाळांना गोष्टी सांगून आपल्या आईच्या कथाकहाण्यांनी डोळे पाणावून सोडणाऱ्या आईची महती “श्यामची आई' या आपल्या अक्षरवाड्मयात श्रेष्ठ असणाऱ्या पुस्तकाने गायली. हा ”श्याम” म्हणजेच साने गुरुजी!

साने गुरुजींच्या बाबतीत निसर्गाने एक चमत्कारच केलेला दिसतो. गुरुजी प्रकृतीने पुरुष पण कृतीने मातेचे हृदय त्यांना लाभलेले दिसते. म्हणूनच त्यांना मातृधर्मी साने गुरुजी असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील सानथोर मंडळींची माउली
म्हणजेच साने गुरुजी! मातृधर्मी साने गुरुजींनी मराठी मुलखात सर्वांना आईचे प्रेम भरभरून दिले. आचार्य अत्रे यांनी तर “साने गुरुजींची 'श्यामची आई' म्हणजे मातेचे महन्मंगल स्तोत्रच होय” असे म्हटले आहे. “गुरुजी मातृहृदयाचे कवी होते.
प्रौढांच्या सानिध्यात लाजाळूप्रमाणे संकोच पावणारे गुरुजी मुलांच्या सहवासात सूर्यविकासी कमळाप्रमाणे आपोआप हसू लागत आंणि कारंज्याच्या धारांप्रमाणे उचंबळू लागत. त्यांना पाहून मुलांना आपली आई भेटल्याचा आनंद होई आणि
हृदयाची कपाटे उघडून ती आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्यांच्याशी करू लागत.

महाराष्ट्रातील हजारो मुलांशी त्यांची मैत्री होती. मुलांना स्वयंपाक करून जेवू घालावे, दुखण्याबहाण्यात त्यांची शुश्रूषा करावी, थोरांच्या आणि शूरांच्या गोष्टी सांगून त्यांना पराक्रमी करावे, याचा गुरुजींना निदिध्यास लागून राहिला होता.
मातृत्वाने गुरुजींचे हृदय एकसारखे ओसंडत होते, म्हणूनच त्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून बाहेर पडणारे प्रत्येक अक्षर अन्‌ अक्षर पावित्र्याने आणि मांगल्याने ओथंबून निघाले.”

मातृह्रदयी साने गुरुजींनी आपल्या उण्यापुऱ्या एकावन्न वर्षांच्या आयुष्यात मराठी मुलखात बरीच मोठी कामे केली. एका साने गुरुजींमध्ये विविध स्वरूपातील साने गुरुजी होते. मातृप्रेमी व मातृधर्मी साने गुरुजी, आदर्श शिक्षक साने गुरुजी,
स्वातंत्र्यलढ्यातील व समाजसेवेतील क्रांतिकारक साने गुरुजी, किसान-कामगारांचे व गोरगरीब दलितांचे आणि शोषित महिलांचे कैवारी साने गुरुजी, साहित्यिक साने गुरुजी, कवी साने गुरुजी, भारतीय संस्कृतीचे भाष्यकार साने गुरुजी, लोकसाहित्याचे संग्राहक व परभाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचे अनुवादक आणि रूपांतरकार साने गुरुजी, संपादक-पत्रकार साने गुरुजी, मुलांचे मनोरंजन करता करता त्यातूनच प्रभूशी नाते जोडणारे साने गुरुजी, आंतरभारतीचे प्रवक्ते साने गुरुजी या रूपातील साने गुरुजींचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी, बहुआयामी --'मल्टिडायमेन्शनल' होते!

अशा या सेनानी साने गुरुजींची ही कहाणी!

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click