Designed & developed byDnyandeep Infotech

६. श्याम पदवीधर झाला!

Parent Category: मराठी पुस्तके

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

६. श्याम पदवीधर झाला!

चार वर्षांच्या कॉलेजमधील शिक्षणाबरोबरच श्यामला अन्य सामाजिक कार्यातही भाग घेण्याची संधी लाभली. त्या वेळच्या म्युनिसिपालिटीच्या वतीने होणाऱ्या खानेसुमारीच्या कार्यात एक स्वयंसेवक म्हणून श्यामने भाग घेतला. घरोघर जाऊन ही नोंदणी करताना त्याला अनेक तर्‍हेचे भलेबुरे अनुभव आले. अज्ञान, दारिद्र्य, जीर्ण रूढी, विविध तऱ्हेचे मानवी स्वभाव ह्यांचे एक सामाजिक दर्शनच घडले. समाजस्थितीची थोडीशी कल्पनाही त्याला आली.

याच काळात पुण्यातील किर्लोस्कर नाटकगृहात व गायकवाड वाड्यात सभा होत असत. डॉ. अँनी बेझंट, सरोजिनी नायडू, हॉर्निमन, चित्तरंजन दास, मोतीलाल घोष, बिपिनचंद्र पाल, कस्तुरीरंग अय्यंगार इत्यादी त्या काळातल्या प्रख्यात
देशभक्तांची तेजस्वी भाषणे ऐकायची संधीही श्यामला लाभली. अशी व्याख्याने तो सहसा कधी चुकवत नसे.

श्यामचा मित्र राम एका मित्रमंडळात जात असे. या मंडळातील मुलांना श्याम संस्कृत शिकवायला जात असे. शिकवण्यासाठी नवीन, चांगले, काव्यमय, पण साधे असे श्लोक श्याम प्रयत्न करून शोधून ठेवीत असे. या मित्रमंडळात दर रविवारी व्याख्यानेही होत असत. श्यामने रामच्या आग्रहावरून रामतीर्थांच्या जीवनावर दीड तास अस्खलितपणे व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी असलेले प्रोफेसर म्हणाले, “रामतीर्थांचे सारे वाड्मय जणू आजच्या व्याख्यात्याच्या ओठांवर
आहे. असेच वाचन, मनन, चिंतन त्यांनी चालू ठेवावे.”

राम आजारी पडला तेव्हा श्याम त्याच्याजवळ बसून त्याला वाचून दाखवीत असे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरच्या दिव्यांचा प्रकाश खिडकीतून खोलीत येत असे. त्याच प्रकाशात श्याम नेहमी अभ्यास करीत असे.
त्याच सुमाराची घटना. श्याम मुंबईला उन्हाळ्याच्या सुट्टीत आला होता. एके संध्याकाळी चौपाटीवर गेला. तेथे प्रचंड जनसमुदाय त्याला दिसला. स्वामी श्रद्धानंदांचा खून झाला होता आणि त्या निमित्ताने तेथे दुखवट्याची सभा होती.गांधींही त्या सभेत बोलले. श्याम म्हणतो, “त्या वेळेस मी महात्माजींना प्रथमच पाहिले. भारताचा आत्मा पाहिला. भारताची पुण्याई पाहिली. भारताचे तप पाहिले. वैराग्य पहिले. चालतीबोलती गीता पाहिली. सत्यप्रेमाचा नवा अवतार पाहिला. माझे डोळे भरून आले होते. मी सद्रदित झालो होतो. हदय उचंबळून आले होते.”

गांधीजींचा श्यामच्या जीवनावर झालेला हा प्रथम संस्कार ! पुढे तो अधिकाधिक दृढ होत गेला.

कॉलेजचा अभ्यास चालू असतानाच श्यामचे इतरही वाचन सुरू असे. त्या वेळी त्याला इंग्रजी वाड्मयाचे जणू वेडच लागले होते. वाचनालयात बसून त्याने कितीतरी उत्तमोत्तम इंग्रजी बंथ वाचले. श्री. अरविंदांचे 'आर्य' मासिक त्याला खूप
आवडायचे. त्यात गीतेवर निबंध येत असत. तसेच योग, भारतीय संस्कृती, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान यांवरही लेख असत.

कार्लाईल हा तर श्यामचा आवडता लेखक होता. कार्लाईलचे निबंध त्याने पाठ केले होते. तो नुकताच वाचीत नसे तर महत्त्वाचे टिपून घेत असे. श्याम म्हणतो, “इंग्रजीतील सारे उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणावे असे माझ्या मनात येई.”
माय मराठी मातृभाषा सुंदर व समृद्ध करावी, अशी तळमळ तेव्हापासूनच श्यामला लागून राहिली होती.

त्याच वेळी पुण्यात बालवीर चळवळ सुरू झाली होती. श्यामने शिवाजी पथकात प्रवेश मिळवला. दररोज संध्याकाळी खेळ-कवायत असे. तसेच प्रथमोपचार, आकाशदर्शन, संदेशवहन, वनसंचार इत्यादी विविध प्रकारचे शिक्षणही असे. श्याम बालवीर चळवळीत चांगलाच रमला होता.

बालवीरांना रोज दैनंदिनी लिहावी लागे. तिच्यात रोज एक तरी सत्कृत्य लिहावे अशी अपेक्षा असे. श्याम भल्या पहाटे उठून लकडी पुलाजवळ थांबत असे. सकाळच्या वेळी खेड्यांतून गाणी गात येणाऱ्या ओझेवाल्या बायका तिथे
विसाव्याला थांबत असत. श्याम त्यांच्या डोक्यावर त्यांची ओझी पुन्हा उचलून देत असे. दैनंदिनीत हे सत्कृत्य नोंदवून ठेवत असे.

१९२०-२१ हा गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या असहकार चळवळीचा तेजस्वी काळ! गांधीजींच्या हाकेला स्मरून अनेक डॉक्टर्स, वकील, शिक्षक, विद्यार्थी इत्यादींनी आपापले व्यवसाय सोडून चळवळीत उडी घेतली होती. श्यामलाही राहवले नाही. त्यानेही कॉलेजला रामराम ठोकला. घरी वडिलांना पत्र लिहून कळवले, “तुमचा एक मुलगा देशासाठी फकीर झाला असे समजा!”

पत्र मिळताच भाऊराव पुण्याला धावत आले. त्यांनी श्यामला शिक्षण पूर्ण करण्याविषयी पुष्कळ समजावले. प्रो. द. वा. पोतदार यांनीही तसाच उपदेश केला.श्यामने पुनश्च शिक्षणास सुरुवात केली. प्रो. द. वा. पोतदार यांचे श्यामवर विशेष
प्रेम होते. त्याच्यासाठी त्यांनी एम. ए. ला मराठीत उपयोगी पडावे म्हणून 'मराठी गद्याचा इंग्रजी अवतार' नावाचे पुस्तक लिहिले. श्यामची एम. ए. ची मराठीची उत्तरपत्रिका वाचून ते इतके खूष झाले होते की, त्यांनी उत्तरपत्रिकेवर लिहून ठेवले
की, 'हा मुलगा पुढे मोठा लेखक होईल!' त्यांचे हे निरीक्षण पुढे एखाद्या भविष्यासारखे तंतोतंत खरे ठरले.

अनेक तऱ्हेच्या अडचणी, संकटे यांच्याशी झुंजून श्यामने आपले शिक्षण पूर्ण केले. १९२२ साली तो संस्कृत ऑनर्स व मराठी हे विषय घेऊन बी. ए. झाला. बी.ए. झाल्यानंतर श्यामने अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात तत्त्वज्ञानाच्या
अभ्यासास जायचे ठरवले. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे त्याचा ओढा होताच.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

X

Right Click

No right click